कराड प्रतिनिधी | कराड शहरात अनेक एतिहासिक वस्तू आहेत. त्यामध्ये सर्वाधिक एतिहासिकपैकी जामा मशीद येथील मनोरे होय. या मनोऱ्यास आज कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः मनोऱ्यामध्ये सर्वात वरच्या मजल्यापर्यंत जाऊन पाहणी केली. तसेच एतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा व त्याच्या डागडुजी संदर्भात माहिती घेण्याचा उपक्रम सुरू केला असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी जामा मस्जिद ट्रस्टचे प्रमुख अल्ताफ शिकलगार मझर कागदी साबीरमिया व इतर मान्यवर उपस्थित होते. पुरातन वास्तुशास्त्र आणि इतिहास हा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचा अभ्यासाचा विषय आहे. तसेच प्राचीन व मध्ययुगीन वास्तु शैली यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यामुळे आपल्या शहरातील पुरातन वास्तू जतन करणे यासाठी त्यांनी ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा व त्याच्या डागडुजी संदर्भात माहिती घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
मनोरा संदर्भात बैठकीमध्ये सर्व मान्यवरांनी मनोरा वास्तू जतन करण्यासंदर्भात आपली मते व्यक्त केली व त्याकरिता पुढील उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. हा उपक्रम शहरातील सर्व ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भात हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व इतिहास प्रेमी व आवड असणाऱ्या नागरिकांनी संपर्क साधण्याचे तसेच मदत करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.