हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड शहरात डीवायएसपी म्हणून आलेल्या अमोल ठाकूर यांनी दोन दिवसात धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे कराडकरांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या या कारवाईच्या मोहिमेमुळे अनेकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. कराड शहरातील संघटित गुन्हेगारीबरोबरच चाललेल्या अनुचित प्रकारांवर विशेष लक्ष ठेवणार आहे. तसेच स्पर्धा परिक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक चळवळ उभारणार असल्याचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
गडचिरोलीसारख्या नक्षल प्रवणक्षेत्रातील अहेरी उपविभागात काम केलेल्या डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी कराड शहरात येताच कराड, मलकापूरसह विद्यानगर परिसरातील अनेक कॅफेंवर धडक कारवाई केली. एकाच दिवसात त्यांनी पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्यास अटकही केली.
‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना डीवायएसपी ठाकूर म्हणाले, कराड शहरात काम करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ज्या सूचना दिल्या जातात. विशेष म्हणजे आम्हालाही आमच्या आधिकाऱ्यांनी काही ब्रेकिंग गोष्टी दिल्या आहेत. पिस्टल रिकव्हरी तसेच संघटित गुन्हेगारी अशा गोष्टी कराड शहरातून हद्दपार करण्यासाठी विशेष लक्ष देणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबाबत डीवायएसपींची ‘ही’ इच्छा
कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांना स्पर्धा परीक्षेचा चांगला अनुभव आहे. कारण ते स्वतः स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून डीवायएसपी पदापर्यंत पोहचले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात शिक्षण घेतले आणि पुढे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. कराड शहरात काम करत असताना एकदा महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांशी एकत्रितपणे संवाद साधण्याची इच्छा डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधताना बोलून दाखविली.
‘उंच भरारी’च्या माध्यमातून एक नवा उपक्रम हाती
जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी ज्या प्रकारे उंच भरारी योजना राबविली आहे. या योजनेच्या अंतर्गत एक नवा उपक्रम लवकरच कराड शहरात राबविणार आहोत. तसेच महाविद्यालयातील जे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत ते यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून काम पाहणार असल्याचे कराडचे DYSP अमोल ठाकूर यांनी यावेळी सांगितले.