सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील रंगीबेरंगी रान फुलांच्या फुलोत्सवयामुळे या ठिकाणी लाखो पर्यटक भेटी देतात. यंदाही लाखोहुन अधिक पर्यटकांनी कास पठारास भेटी दिलय असून मागीलवर्षी पेक्षा दुप्पट फुलांबरोबरच तब्बल दीड कोटींचा महसूल जमा झाला आहे.
यावर्षी दि. ३ सप्टेंबर रोजीपासून फुलांचा अधिकृत हंगाम सुरू झाला. यावेळी या ठिकाणी भेटी देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रवेश देण्यात आला. यावर्षी सप्टेंबर नंतरच फुले चांगली बहरल्याने ऑनलाईनची ३ हजार तिकीट विकेंडला क्षणात संपत होती. तिकीट न मिळाल्याने अनेक जण थेट येत असल्याने शनिवार रविवार प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडीही झाली.
यावर्षी पठारावरील कुंपण हटवल्याने पठारावर वेगवेगळ्या प्रजाती चांगल्या प्रकारे बहरल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात येणारी गेंद, तेरडा, सितेची आसवे, सोणकी, मिकी माऊस, चवर यांचे गालिचे पाहावयास मिळाले. टोपली कारवी ही यावर्षी बहरल्याचे पाहावयास मिळाले. अनेक दुर्मिळ प्रदेशनिष्ठ फुले कासवर येतात. यावर्षी यातील किटकभक्षी ड्राॅसेरा इंडिका, बर्मानी, कंदीलपुष्प, आभाळी, नभाळी, आमरी, सातारेन्सीस, टूथब्रश अशी फुले ही चांगली होती.
मागीलवर्षी ५० हजारांच्या आसपास पर्यटकांनी कासला भेट दिली होती. यातून ७५ लाखांच्या आसपास महसूल जमा झाला होता. पण यावर्षी पर्यटकांची संख्या दुप्पट होण्याबरोबरच महसूल ही दीड कोटींच्या पुढे गेला. हंगाम दि. ३ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत फक्त सव्वा महिनेच चालला. यामध्ये शनिवार, रविवार प्रचंड गर्दी होवून पर्यटकांची गैरसोय झाली. ऑक्टोबर मध्ये पावसाने ओढ दिल्याने फुलांनी लवकर निरोप घेतला.