सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची कायम गर्दी असते. महाबळेश्वरची संध्याकाळची गुलाबी थंडी, हिरवागार निसर्ग अशा वातावरणात महाबळेश्वर पर्यटनस्थळी गर्दी सध्या वाढत आहे. मात्र, दुपारच्या वेळी सूर्य चांगलाच तळपत असून पारा सरासरी ३२ अंशांपर्यंत जात आहे. परिणामी पर्यटकांच्या अंगातून घामाच्या धारा लागत आहे. तर उकाडा कमी करण्यासाठी महाबळेश्वरातील व्यापाऱ्यांकडून बाजारपेठेत मांडव उभा करण्यात आला आहे.
वर्षभराप्रमाणे एप्रिल-मे महिन्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. या ठिकाणी हिरवागार निसर्ग, थंडगार हवेचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातून तसेच महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यातून लाखो पर्यटक महाबळेश्वर फिरण्यास सध्या दाखल होत आहेत.
महाबळेश्वर येथील ॲार्थर सिट, केट्स पॉईंट, क्षेत्र महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉइंट ही पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजली आहेत. यंदा मात्र महाबळेश्वरच्या तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. सकाळी साडेअकरा ते चार वाजेपर्यंत ३२ अंश तर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर सायंकाळी १८ अंशपर्यंत तापमान जात आहे. स्थानिक नागरिकांची घरे, दुकानामध्ये पंख्याची आवश्यकता भासू लागली आहे.