अवकाळीमुळे जिल्ह्यात गारवा; तापमानाचा पारा खालावला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कडक उन्हामुळे मे महिना तापदायक ठरतो मात्र, यंदा अवकाळी पावसाने धडाका लावल्याने जिल्ह्यातील पारा खालावला आहे. सातारा शहराचे तापमान तर ३३ अंशापर्यंत खाली आले असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे.

मार्च महिन्याच्या मध्यापासून उन्हाळी झळा जाणवायला सुरूवात होतात. सूर्यनारायण आग ओकू लागतो. सुरुवातीला कमाल तापमान ३५, ३६ अंशापर्यंत जाते. त्यानंतर एप्रिलच्या मध्यानंतर पारा ४० अंशाचा टप्पा ओलांडतो. त्यामुळे एप्रिल आणि मे हे दोन महिने तापदायक ठरतात. कारण, पारा सतत वाढलेला असतो. परिणामी उन्हाच्या तीव्र झळा लागतात. अंगातून घामाच्या धारा लागतात. तसेच उकाड्याने हैराण होण्याची वेळ येते. पण, यावर्षी मे महिनातरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी चांगला गेला आहे.

जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून पारा वाढला. कमाल तापमान ३९ अंशावर गेले होते. तर एप्रिल महिन्यात तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला होता. त्यातच सतत काही दिवस पारा ४० अंशावरही राहिल्याचे दिसून आले होते. यामुळे जिल्ह्यातील नागरिक तीव्र उकाड्याने हैराण झालेले. दिवसा तर घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. त्यामुळे शहरवासीयांना प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागले. तर मे महिन्याची सुरुवातही उच्चांकी तापमानाने ठरली.

पहिले आठ दिवस पारा अधिक होता. त्यामुळे एप्रिलमधील पाऱ्याचा उच्चांक मोडला जाणार असे वाटत होते. पण, १० मे नंतर जिल्ह्यात ढगाळी वातावरण तयार झाले. तसेच वळवाचा पाऊसही पडू लागला. त्यामुळे पारा खालावला आहे. मागील जवळपास १५ दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वळवाचा पाऊस होत आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. परिणामी उकाडाही कमी झाला आहे. सातारा शहरातील तापमान तर ३३ अंशापर्यंत खाली आले आहे.

सातारा शहरात झालेली नोंद कमाल तापमानमध्ये

दि. ५ मे ४०.७, ६ मे ४०, ७ मे ३९.१, ८ मे ३९.२, ९ मे ३९.२, १० मे ३६.७, दि. ११ मे ३८.२, १२ मे ३३.४, १३ मे ३६.७, १४ मे ३८.२, १५ मे ३६.७, १६ मे ३७.७, १७ मे ३६.९, दि. १८ मे ३८.५, १९ मे ३८.७, २० मे ३७.८, २१ मे ३८.४, २२ मे ३५.८, २३ मे ३७.२, २४ मे ३६.४ आणि दि. २५ मे ३२.६