उड्डाण पुलाच्या कामामुळे सातारा-पुणे मार्गावरील वाहतुकीत उद्यापासून बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शिरवळ हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी फाटा येथे नवीन उड्डाण पुलाचे काम मंगळवारी सुरू झाले आहे. त्यामुळे पुणे सातारा-मार्गावर खंडाळा हद्दीत ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. तशी अधिसूचना जारी करण्यात आली असून पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीत बदल

खेड-शिवापूर ते शेंद्रे-सातारा दरम्यान काम सुरू आहे. त्याअंतर्गत शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथील उड्डाण पुलाचे काम आजपासून सुरू झाले आहे. हे काम पुर्ण होईपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील वाहतूक ठिकठिकाणी वळविण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसुचना सातारा पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी सायंकाळी जारी केली आहे.

दिशादर्शक फलक लावून बंदोबस्त तैनात

वाहतूक वळविण्यात आलेल्या सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतुक मार्गातील बदलाची नोंद घेऊन नागरिक आणि वाहनधारकांनी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.

असा आहे वाहतुकीत बदल

1) शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूकशिंदेवाडी फाटा येथून सर्व्हिस रस्त्याने वळविण्यात आली आहे.

2) भोरकडून साताऱ्याकडे जाणारी वाहने शिंदेवाडी फाटा येथून सर्व्हिस रस्त्याने सारोळा पुलाखालून यू टर्न घेऊन पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून जातील.

    3) पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुक ही शिंदेवाडी फाटा येथून सर्व्हिस रस्त्याने वळविण्यात आली आहे.

    4) पुणे बाजुकडून भोरकडे जाणारी वाहतुक ही शिंदेवाडी फाटा पास करुन पंढरपुर फाटा, शिरवळ येथून यू टर्न मारुन शिंदेवाडी फाट्यावरून भोरकडे जाईल.