सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा मार्गावरील महत्वाच्या असलेल्या खंबाटकी घाटात वाहनांच्या आज सकाळपासून लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दिवाळी सणामुळे सलग सुट्ट्या असल्याने मुंबई पुण्याहून कोल्हापूर, सातारा सांगली आणि कोकणात जाणाऱ्या लोकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे पुणे- बंगळूर महामार्ग तसेच खंबाटकी घाटात अवजड तसेच लहान वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी घाटामध्ये सतत सुरु असणाऱ्या वाहनांचे इंजिन गरम होऊन ती बंद पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अशा बंद पडलेल्या वाहनांना तत्काळ बाजूला घेतले जात आहे.
सध्या खंबाटकी घाटात रात्रीपासून आतापर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. दिवाळीमुळे लहान मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या असून नोकरदार वर्गासह तीन ते चार दिवसाच्या सलग सुट्ट्या असल्यामुळे ते गावी परतत आहेत. घाटात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
तसेच पोलिसांकडून बंद पडलेली वाहने क्रेनच्या साहयाने बाजूला केली जात आहे. दरम्यान, घाटात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिसांवरील ताण मात्र वाढला आहे. तसेच बंद पडलेल्या वाहनांना बाजूला करण्यात देखील अडचणी येऊ लागलेल्या आहेत.