सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या 8 तालुक्यांतील 65 महसुली मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडलांतील दुष्काळग्रस्तांना सर्व सवलती लागू होणार आहेत. राज्य शासनाकडून नुकतीच दुष्काळसदृश तालुक्यांची यादी शासनाने जाहीर केली.
मुंंबईत मंत्रालयातील वॉर रूम येथे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभाग व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील दुष्काळसदृश तालुके व महसूल मंडले जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील 8 तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या 65 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आल्याने या महसुली मंडलातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार्या सर्व सवलती लागू होणार आहेत.
65 महसुली मंडलांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी आणि 750 मिमी पेक्षा कमी पाऊस पडल्याचा निष्कर्ष घेऊन जिल्ह्यातील सातारा, फलटण, कोरेगाव, माण, खटाव, कराड, पाटण आणि जावली तालुक्यातील कमी पर्जन्य झालेल्या महसूल मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, जावली, कराड, पाटण तालुक्यांचा तावडीत समावेश आहे.
‘या’ सवलतीचा मिळणार लाभ
जमीन महसूलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5 टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या दुष्काळी तालुक्यांना लागू केलेल्या सवलती देण्यात येणार आहेत.