सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विसावा नाका येथील दोन दाबनलिका फुटल्याने शाहूनगर, सदरबझार, दौलतनगर, पिरवाडी आदी भागांत सात दिवसांपासून पाण्याचा ठणाठणाट सुरु आहे. दरम्यान, पाइप जोडण्याचे काम वेगाने सुरु असून उद्यापर्यंत हे काम पूर्णत्वाला जाण्याची शक्यता आहे.
शहरातील शाहूनगर, सदरबझार, दौलतनगर, पिरवाडी, जुना आरटीओ चौक परिसरात प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. या भागासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या दाबनलिकेचा गळती लागली आहे. त्यामुळे शनिवारपासून शाहूनगरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. दाबनलिकेची दुरुस्ती करण्याचे काम सोमवारपासून दोनदा करण्यात आले.
मात्र, ही गळती काढण्यात पूर्णत: यश आले नाही. पाइपलाइन अत्यंत जुन्या असल्याने गळती निघण्यात अडचण येत आहे. आता नव्याने साहित्य आणून ही गळती काढण्याचे काम सुरु आहे. मात्र, या समस्येमुळे शाहूनगरात सोमवारपासून पाणी सोडण्यात आलेले नाही. घराघरांतील पाणी संपल्याने लोकांना पिण्यासाठी, वापरण्यासाठीही पाणी शिल्लक राहिले नाही. त्यामुळे लोकांना टँकर मागवून विकत पाणी घ्यावे लागत आहे. टँकरद्वारेही पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने लोकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.