जीवनात यश मिळविण्यासाठी वेळेचा सन्मान केला पाहिजे : डॉ. विनोद बाबर

0
132
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अनावश्यक वापर करून वेळेचा अपव्यय करु नये. वेळेचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. वेळेची आपल्या स्वतःशी सांगड घालून जीवनाकडे वास्तव सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळविण्यासाठी वेळेचा सन्मान केला पाहिजे, असे प्रतिपादन उंब्रज येथील प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. विनोद बाबर (vinod babar) यांनी केले.

श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व जिमखाना विभाग आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व गुणवंत सत्कार समारंभा प्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.) सतीश घाटगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. उज्वला पाटील उपस्थित होते.

यावेळी डॉ. विनोद बाबर पुढे म्हणाले की, नेहमीच आपली स्वप्नं आणि ध्येय मोठी असली पाहिजे. आजच्या तरुण पिढीने थोर महापुरुष व समाजसुधारकांचा आदर्श घेऊन कुटुंब, समाज व राष्ट्र उभारणीमध्ये योगदान दिले तर देश निश्चितच सुजलाम सुफलाम बनेल यात शंका नाही. यावेळी प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले की, आजच्या पिढीमध्ये ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार हे बापूजींनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आणि विचार रुजविणे काळाची गरज आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचं आचरण असेल तर जीवन जगणं हे निश्चितपणे सार्थकी लागु शकते.

यावेळी वार्षिक अहवाल वाचन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. उज्वला पाटील यांनी केले. जिमखाना विभागाचे पारितोषिक वितरणाचे वाचन प्रा.देवदत्त महात्मे तर सांस्कृतिक विभागाचे पारितोषिक वितरणाचे वाचन प्रा.डॉ.मारुती सुर्यवंशी तर ज्युनिअर विभागाचे पारितोषिक वितरणाचे वाचन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सुरेश यादव यांनी केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरणा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून देताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.) सतीश घाटगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोतिराम अंबवडे व प्रा.रुपाली यादव यांनी तर आभार जिमखाना विभाग प्रमुख प्रा. देवदत्त महात्मे यांनी मानले.