कराडात प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहानेंचे डिजिटल साधनांचा वापर अन् डोळ्यांचे आरोग्य या विषयावर शुक्रवारी व्याख्यान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | रोटरी क्लब ऑफ कराड चा 68 वा पदग्रहण सोहळा शुक्रवार, दि. 12 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता येथील स्व.यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे पद्मश्री प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी त्यांचे डिजिटल साधनांचा वापर व डोळ्यांचे आरोग्य या विषयावरती व्याख्यान होणार आहे. तसेच रो. सदस्य डॉ. अस्मिता फासे निर्मित प्रतिबिंब रोटरी कला प्रदर्शनाचे उद्घाटन ही होणार आहे.

रोटरी क्लब ऑफ कराड 68 व्या वर्षात पदार्पण करीत असून क्लबने स्थापनेपासून कराड शहर व परिसरामध्ये विविध सामाजिक प्रकल्प उभे केले आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 मध्ये नाविन्यपूर्ण काम करून नावलौकिक मिळवला आहे. हे सामाजिक कार्य पुढील वर्षासाठी अविरत चालवण्यासाठी उत्सुक असणारे रोटरी क्लब ऑफ कराडचे प्रेसिडेंट रो.रामचंद्र लाखोले, सेक्रेटरी रो.आनंदा थोरात व सर्व संचालक मंडळ यांचा पदग्रहण सोहळा होत आहे. यावेळी रोटरी परिवारातील तरुण-तरुणींचे संघटन असणारा रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी प्रेसिडेंट रो.अजीम कागदी, सेक्रेटरी रो. प्रथमेश कांबळे व संचालक मंडळ यांचाही पदग्रहण सोहळा यानिमित्त होणार आहे. या कार्यक्रमास असिस्टंट गव्हर्नर रो. राजीव रावळ यांची उपस्थिती राहणार आहे.

रोटरी क्लब ऑफ कराडच्या पदग्रहण सोहळ्यास पद्मश्री प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांचे व्याख्यान होणार आहे. डॉ.लहाने यांनी आजपर्यंत 1 लाख 63 हजार यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करून विश्वविक्रम केला आहे. त्यांनी सलग 18 ते 23 तास शस्त्रक्रिया केल्या आहेत. या कार्यक्रमांमध्ये डिजिटल साधनांचा वापर व डोळ्याचे आरोग्य या महत्वपूर्ण विषयावरती त्यांचे अनमोल मार्गदर्शनपर व्याख्यान ऐकायला मिळणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये रोटरी क्लब ऑफ कराडच्या काही नवीन प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रोटरी क्लब कराडचे सन्माननीय सभासद यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
रो. डॉ.अस्मिता फासे यांचे निर्मित प्रतिबिंब रोटरी कला प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते होणार आहे. हे रोटरी कला प्रदर्शन शनिवार व रविवार रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये डॉ.अस्मिता फासे निर्मित विविध नाविन्यपूर्ण कला पाहण्यासाठी मिळणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ कराड यांच्यावतीने होत असलेल्या या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रेसिडेंट बद्रिनाथ धस्के आणि सेक्रेटरी शिवराज माने यांनी केले आहे.