कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत ओंडमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयवसह साहित्याचे वितरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओंड येथे दिव्यांग मेळावा पार पडला. यावेळी पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिण मधील दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साहित्याचे वितरण करण्यात आले. “दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल काम करत आहे. दिव्यांगांवर उपचार, तसेच त्यांचे मनौधर्य वाढविण्यासाठी येत्या काळात कराडमध्ये दिव्यांग सहाय्य संस्था सुरू करण्यात यावी,” असा मानस डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.

यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, सर्जेराव थोरात, व्ही. पी. थोरात, राजेंद्र थोरात, ॲड. अशोकराव थोरात, कृष्णत थोरात, प्रदीप थोरात, प्रल्हाद थोरात, प्रकाश थोरात, निवासराव गायकवाड, अरुण थोरात, अविनाश थोरात, प्रवीण थोरात, वैभव थोरात, कृष्णा फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलू, डॉ.गणेश थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. अतुल भोसले म्हणाले की, कृष्णा विश्व विद्यापीठाच्यावतीने संशोधनातून तयार केलेली कृत्रिम उपकरणे परिसरातील दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. आयुष्य जगण्याची दिव्यांगांची जिद्द वाखाणण्याजोगी असून, त्यांना दिलासा देण्यासाठी हे कृत्रिम अवयव व साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. येत्या काळात दिव्यांगांना कोणतीही अडचण आल्यास ती सोडवण्याची आम्ही सदैव तत्पर आहोत.