कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दीड दिवसात गंभीर आजारांच्या 42 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड येथील वेणूताई उपजिल्हा रुग्णालयात मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे प्रसिद्ध बाल चिकित्सा सर्जन डॉ. पारस कोठारी यांच्यासह त्यांच्या 8 जणांच्या टीमकडून हरनिया, जिभेवरील तसेच अंडाशयतील गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या 42 बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेविकांच्यावतीने कराड व पाटण तालुक्यातून 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांच्यापैकी 42 बालकांना कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. पारस कोठारी यांच्यासह त्यांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया केली. सातारा जिल्ह्यात कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच अशा प्रकारच्या 42 लहान बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

कराड व पाटण तालुक्यातील दुर्गम अशा भागातील गावात अंगणवाडीतून आरोग्य सेविकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये जी बालके गंभीर स्वरूपाच्या आजारांनी ग्रस्त आढळून आली. त्यांना सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची येथील बालरोगतज्ञांच्या मार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्या बालकांवर उपचार करण्यासाठी मुंबईच्या सायन हॉस्पिटलमधील डॉ. पारस कोठारी यांच्या टीमला कराड येथे दि. 18 रोजी बोलवण्यात आले. या ठिकाणी दाखल झाल्यानंतर डॉ. पारस कोठारी यांच्या टीमने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत 42 बालके आणि 2 व्यक्तींवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली.

मुंबईतील सायन हॉस्पिटलचे बाल चिकित्सक डॉ. पारस कोठारी यांच्यासह डॉ. संजय ओक, डॉ. शहाजी देशमुख, डॉ. मैत्री सावे, डॉ. ऑन्ड्री पायस, भूलतज्ञ डॉ. अंकेष झुनझुनवाला, डॉ. आकृती प्रभू, डॉ. अक्षता पवार, स्टाफ विदुला मजनी, कुमुल खडपे यांनी दीड दिवसात अवघड अशा स्वरूपाच्या जिभेला जीभ चिकटलेल्या, हर्नियाच्या, हायड्रोसिस, अंडाशयावरील शस्त्रक्रिया, बेंबीतील शस्त्रक्रिया असा एकूण 44 शस्त्रक्रिया केल्या.

कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 डॉ. राजेश शेडगे, भूलतज्ञ डॉ. प्रशांत देसाई यांच्यासह रुग्णालयातील को ओर्डीनेटर श्रीमती कुमुत खडपे यांच्या समन्वयाने बालकांवर यशस्वी स्वरूपात शस्त्रक्रिया पार पडल्या. कराड व पाटण तालुक्यातील दुर्गम अशा भागातील गावातील 42 बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांच्या पालकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

बालकांच्या गंभीर आजारांवर उपचारासाठी आता डॉक्टर आल्या दारी : डॉ. पारस कोठारी

0 ते 18 वयोगटातील बालकांना अनेक गंभीर स्वरूपाचे आजार उध्दभवतात. अशा बालकांना पालकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये अनेक गंभीर अशा स्वरूपाच्या आजारांवर उपचार केले जातात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या गंभीर आजारावर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात वडूज नंतर आता कराड या ठिकाणी बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आल्या आहेत. अनेकदा बालकांना गंभीर आजार उध्दभवल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पैशाअभावी पालकांना मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी जात येत नाही. अशा पालकांसाठी राष्ट्रीय बाळ स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत मोफत उपचार केले जातात. त्यासाठी आम्ही सर्व सोयी असलेल्या तालुका पातळीवरील शासकीय रुग्णालयात येऊन शस्त्रक्रिया करत असतो. यापुढेही अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया केल्या जातील या कार्यक्रमातंर्गत आता डॉकटर आपल्या दारी येणार हे नक्की अशी माहिती सायन हॉस्पिटलचे बाल चिकित्सक डॉ. पारस कोठारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

बालकांना असलेल्या गंभीर आजारा संदर्भात संपर्क साधा : डॉ. राजेश शेडगे

साधारणतः लहान मुलांच्या गंभीर स्वरूपाच्या असलेल्या शस्त्रक्रियेसाठी 5 ते 25 हजार रुपये इतका खर्च खासगी दवाखान्यात येतो. मात्र, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत स्वरूपात केल्या जातात. अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया संदर्भात कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी बालकांच्या पालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन ‘हॅलो महाराष्ट्र’ शी संवाद साधताना उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 डॉ. राजेश शेडगे यांनी केले.