सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या ३८ उमेदवारांच्या पहिल्या यादीत वाई विधानसभा मतदार संघातून मकरंद पाटील यांचा समावेश करण्यात आल्यानंतर पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नेमका कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या मतदार संघातून शरद पवार गटाकडून नुकतीच डॉ. नितिन सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून डॉ. नितीन सावंत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
एकीकडे आ. मकरंद पाटील यांचा वाई विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क तर दुसरीकडे डॉ. नितीन सावंत यांचा विकासासाठीचा झंजावात या निवडणुकीत मोठे आव्हान उभे करू शकतो. डॉ. नितीन सावंत यांच्या मागे ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, माजी खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार तसेच वाई विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी पदाधिकारी आणि जनतेचे पाठबळ असणार आहे.
अशा प्रकारचे आहे वाई विधानसभेचे राजकारण
सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा महाबळेश्वर हा तीन तालुक्यांना एकत्रित करून वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर हा मतदार संघ तयार झालेला आहे. सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदार संघ म्हणून देखील याची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील हे सध्या वाई विधानसभेचे नेतृत्व करत आहेत. याआधी मकरंद पाटील यांना विरोध केलेले मदन भोसलेही सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादीमधील फुटीनंतर मकरंद पाटील यांनी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विधानसभेला मकरंद पाटील यांच्यासमोर कोणाचे आव्हान असणार? याबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र, आता वाईतून डॉ. नितीन सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत पहायला मिळणार आहे.
मकरंद पाटलांचे वर्चस्व
वाई विधानसभा मतदार संघामध्ये मकरंद पाटील यांचे वर्चस्व आहे. २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीनवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत वाई विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील आणि काँग्रेसचे मदनराव भोसले यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत मकरंद पाटील यांनी बाजी मारली होती. मकरंद पाटील यांना १,०१,२१८ मदनराव भोसले यांना ६२,५१६ मते मिळाली होती. त्यानंतर झालेल्या २०१९ च्या निवडणुकीत मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली, मात्र त्यांना पुन्हा पराभव स्विकारावा लागला होता. या निवडणुकीत मकरंद पाटील यांना 1 लाख 30 हजार 486 मते तर विरोधी उमेदवार मदन भोसले यांना 86 हजार 839 मतं मिळाली होती.
शरद पवारांनी अखेर डाव टाकला?
राष्ट्रवादीमधील बंडानंतर मकरंद पाटील हे अजित पवारांसोबत केले. मकरंद पाटील यांच्या दोन साखर कारखान्यांनाही अजित पवार यांनी मोठा निधी दिल्याने ते दादांची साथ सोडणे शक्य नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असला तरी वाईमधून त्यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. हेच मताधिक्य मकरंद पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा होती. शरद पवार यांनी विधानसभेला मकरंद पाटील यांना रोखण्यासाठी तगडा उमेदवार दिला आहे. डॉ. नितीन सावंत यांना उमेदवारी देऊन पवारांनी डाव टाकला आहे.