कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालयानंतर देखील अद्याप मुख्यमंत्री कोण? हे निश्चित झालेले नसून अशात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगाव आजारी असल्याने परतले. काल शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता शिंदेंना टोला लगावला. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समन्वयक डॉ. हमीद दाभोळकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “अमावस्येमुळं मुहूर्त मिळत नसल्यानं सरकार स्थापना पुढं ढकलली जात असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे. अर्ज भरताना उमेदवार तिथी, मुहूर्त आणि ज्योतिषाचा आधार घेतात. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचा आणि अशा गोष्टी करायच्या केल्याच दिसून येत आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह नाही”.,” असे दाभोलकर यांनी म्हटले आहे.
‘हॅलो महाराष्ट्र’ ने डॉ. दाभोलकर यांच्याशी आज संवाद साधला असता ते म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी अद्याप देखील नवीन सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे अमावस्येमुळं सरकार स्थापनेचा मुहूर्त मिळत नसून म्हणून सरकार स्थापना पुढे ढकलला असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. एका बाजूला पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूला अशा गोष्टी करायच्या हे पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही.
पुण्यात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
काल शनिवारी पुण्यात समाजसेवक बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी गेलेल्या शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. “एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात आनंद का नाही? बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पूजा-अर्चा करण्यासाठी का जात आहेत. अमावस्येला पूजा अर्चा करण्यासाठी गेले, यावरुन त्यांची मानसिकता दिसून येते, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
“एकनाथ शिंदे यांना शपथविधीसाठी एअर ऍम्ब्युलन्समधून यावं लागेल…” : संजय राऊत
“एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. त्यांच्याविषयी काहीही वेडवाकडं बोलू नका. त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. त्यांच्या हाताला पट्टी लावली आहे. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले, त्यांनाही ते भेटले नाही. म्हणजे त्यांची किती प्रकृती गंभीर आहे. अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही त्रास देऊ नका. ५ डिसेंबरला ते शपथविधीसाठी येणार आहेत का की त्यांना एअर ऍम्ब्युलन्समधून यावं लागेल. अशा चिंतेत अनेक लोक आहेत”, असे आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटले.