सुधारित गोवर्धन गोसेवा केंद्र योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करा; जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र गोसेवा आयोग, पशुसंवर्धन विभागअंतर्गत “सुधारित गोवर्धन गोसेवा केंद्र” ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सातारा, खंडाळा, महाबळेश्वर, जावळी व कोरेगाव या ५ तालुक्यामधून प्रत्येकी एका गोशाळेस शासनाचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित पशु पालक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत. जेणेकरून या योजनेचा त्यांना फायदा होईल, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

सातारा जिल्ह्यातील सातारा, खंडाळा, महाबळेश्वर, जावळी व कोरेगाव सोडले तर उर्वरित तालुक्यांना या अगोदरच या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे. त्यामुळे पाच तालुके सोडले तर इतर तालुक्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले तरी त्यांना या योजनेचा लभ मिळणार नाही. या योजनेअंतर्गत गोशाळेकडे सांभाळ करण्यात येत असणारे पशुधन विचारात घेऊन एक वेळचे अनुदान १५ लाख ते २५ लाख रुपयाच्या मर्यादेत देय असणार आहे. योजनेचा मूलभूत उद्देश, देय अनुदान, अर्जाचा विहित नमुना, अर्ज करण्याची पद्धत इ. बाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती कार्यालय यांचेकडे उपलब्ध आहे.

प्रस्ताव दि. 25 ऑगस्ट अखेर सादर करावेत : डॉ. दिनकर बोर्डे

या निकषात पात्र असणारे सातारा जिल्ह्यातील उपरोक्त तालुक्यांमधील इच्छुक गोशाळा संस्थांनी त्यांच्याशी संबंधित पंचायत समिती येथे संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज व प्रस्ताव दि. 25 ऑगस्ट अखेर सादर करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती डॉ. बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

योजनेचा उद्देश

१) दुग्धोत्पादन, शेतीकामास उपयुक्त नसलेल्या गाय, वळू, बैल व वय झालेले गोवंशचा सांभाळ करणे.
२) पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करुन देणे.
३) पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे.
४) गोमूत्र, शेण इ. पासून विविध उत्पादने, खत, गोबरगॅस व इतर उप-पदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे.
५) गावठी गायींमध्ये शुद्ध देशी गायीच्या जातीच्या वळूचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करुन घेणे.