कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील इंदोली येथील आजारी असणाऱ्या म्हशीवर पशु संवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांच्या वतीने अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर म्हशीला जीवदान देण्यास जिल्हा पशुसंर्वधन टीमला यश आले असून, या सर्व टीमचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
कराड तालुक्यातील इंदोली येथील शेतकरी मंगेश राजेंद्र गुरव यांची म्हैस दहा ते पंधरा दिवसांपासून आजारी होती. म्हशीने चारा खाणे, पाणी पिणे बंद केले होते. कोणत्याही औषधोपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने इंदोली येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. सूर्यकांत नलवडे यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल दडस यांच्या निदर्शनास सदरची बाब आणली असता. डॉ. दडस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन म्हशीची तपासणी केली असता तिच्या पोटात लोखंडी वस्तू असल्याचे सांगत तत्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच म्हशीच्या पोटावर शस्त्रक्रिया करून पोटातील लोखंडी खिळा काढण्यात आला.
परंतु खिळ्यामुळे म्हशीच्या छाती पटलावर मोठे छिद्र पडल्याने दुसरी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी सातारचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांना पाचारण करण्यात आले. डॉ. बोर्डे यांनी म्हशीवर अत्यंत गुंतागुंतीची दुसरी शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिले. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, डॉ. राहुल दडस, डॉ. सूर्यकांत नलवडे तसेच खासगी पशुवैद्यकीय अधिकारी या सर्व टीमचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.