सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाची साथ आटोक्यात : पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाची साथ आटोक्यात आणण्यात पशु संवर्धन विभागास यश आले आहे. मागील महिन्यात लम्पिच्या जनावरांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली होती. या रोगाचा चांगलाच प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढला होता. मात्र, हि साथ आटोक्यात आणण्यात आली असून आतापर्यंत 3 लाख 49 हजार 365 जनावरांचे लसीकरण झाले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

महिनाभरापूर्वी डॉ. दिनकर बोर्डे यांची सातारा जिल्ह्यातील पशुसंवर्धन उपयुक्तपदी नियुक्ती झाली. यानंतर त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लम्पिबाधित जनावरांची माहिती घेतली. याबाबत ग्रामस्थरावर रोगावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच लसीकरण देखील पूर्णपणे करून घेतले.

सातारा जिल्ह्यात राबविलेल्या लम्पि रोग नियंत्रण कार्यक्रमाविषयी डॉ. बोर्डे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात तब्बल 3 लाख 49 हजार 365 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये कराड – 32 हजार 740, फलटण 98 हजार 357, वाई 21 हजार 414, खटाव 36 हजार 604, खंडाळा 22 हजार 773 माण 50 हजार 893, कोरेगाव 27 हजार 804, जावली 8 हजार 823, महाबळेश्वर 6 हजार 594, पाटण 21 हजार 864, सातारा 21 हजार 499 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 45 जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये खिल्लार गाई 19, संकरित गाय 15 व 11 देशी गाईचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात लम्पी स्कीन लसीकरणाबाबत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सातारचे जिल्हा पशु संवर्धन अधिकारी विनोद पवार यांनी देखील सहभाग घेतला. सातारा जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात वाढत असलेल्या लम्पी स्कीनबाबत जनावरांची तपासणी मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली असल्याची माहिती डॉ. बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.