कराड प्रतिनिधी | राज्यातील सर्व जनावरांना इअर टॅगिंग आणि त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांनी जनावरांची नोंद प्रणालीवर करून घ्यावी, असे आवाहन केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.
याबाबत डॉ. बोडरे यांनी हॅलो महाराष्ट्र शी नुकताच संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार भारत पशुधन प्रणालीवर पशुपालकांची सर्व माहिती मोबाईल आणि आधार नंबर तसेच पशुपालकाकडे असणारी जनावरांची माहिती, जनावरांचे वय, लिंग, जात, मिल्किंग स्टेटस् आदी माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. १ जूनपासून इअर टॅगिंग आणि भारत पशुधन प्रणालीवरील नोंदीशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नाही.
तसेच पशुवैद्यकीय सेवा, केंद्र आणि राज्य शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, वन्यपशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसानभरपाईची रक्कम देण्यात येणार नाही. राज्यांतर्गत जनावरांची वाहतूक आणि मालकी हस्तांतरण होणार नाही. त्यामुळे पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी पशुपालकांनी सर्व जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून इअर टॅगिंग करून घ्यावे आणि त्याच्या अचूक नोंदी भारत पशुधन प्रणालीवर तत्काळ करून घ्याव्यात, असे आवाहनही डॉ. बोडरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.