नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ ठेवा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

0
19
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सर्व सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ ठेवा, टाकाऊ साहित्य वेळोवेळी निर्लेखित करा, नेमून दिलेल्या वेळेत वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित असलेच पाहिजेत. रुग्णांना बाहेरिल वैद्यकीय सेवा घेण्यासाठी अनावश्यक संदर्भ टाळा, माता व नवजात शिशुंच्या मृत्युचे प्रमाण टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामाबाबत जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालयांची आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक व जयंत शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) निलेश घुगे यांच्यासह सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी तसेच विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

स्वच्छतेबाबत सर्व विभागांसाठी विभागीय आयुक्तांना नोडल अधिकारी नेमले असल्याचे सांगून विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले, येत्या काळात विविध शासकीय कार्यालये, ठिकाणे यांना अचानक भेटी देण्यात येणार आहेत. कोणत्याही स्थितीत गावे, रस्ते स्वच्छ व सुशोभितच दिसली पाहिजेत. प्लास्टीक कचरा पसरविणाऱ्यांच्या बाबतीत प्लास्टीक बंदी नियमांतर्गत कठोर कारवाई करा. रस्त्यांवर, रिकाम्या जागांवर प्लास्टीक, घाण, कचरा आढळल्यास सर्वांनीच त्याची छायाचित्रे काढून प्रशासनाच्या निदर्शनास आणावीत. रस्ते प्राधिकरणाने महामार्गावरील दोन्ही बाजूला दिसणारा कचरा त्वरीत हटवावा.

नागरीकांना वेळेत व चांगल्या सुविधा मिळण्यासाठी व त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी कोणत्याही परिस्थीतीत दफ्तर दिरंगाई सहन केली जाणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेतील उद्दीष्ट पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. मंजूर घरकुले लवकर पूर्ण होण्यासाठी कर्जपूरवठा विना अडथळा होईल, यासाठी बँकाना आवश्यक ते निर्देश द्यावेत. 31 जानेवारीपर्यंत जीपीडीपी अपलोड होणे आवश्यक आहे. अधिकारी लोकांच्या भेटीसाठी वेळेत उपलब्ध असले पाहिजेत. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा गुणवत्तापूर्ण असल्या पाहिजेत, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

सर्व प्रशासकीय विभागांनी आपआपल्या विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या मालमत्तेची माहिती घेऊन त्यावर आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी. कार्यालयात व परिसरात मोडके तोडके फर्निचर असल्यास निर्लेखित करा. कार्यालयाचे वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी स्वच्छतेबरोबरच रंगरंगोटी नीटनेटकी ठेवा, पडीक डोंगर हिरवेगार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन करा. पोषण आहार उत्तम दर्जाचा असावा असे सांगून रस्त्यावर विकलांग स्थितीत पडलेले निराश्रित, निराधार यांना योग्य ठिकाणी संदर्भीत करा. असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) निलेश घुगे यांनी जिल्हा परिषद विभागामार्फत येत्या शंभर दिवसात प्राधानाने करावयाच्या कामाबाबत सादरीकरण केले.
या बैठकीत विविध विभागांकडील जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पांचा आढावाही विभागीय आयुक्त् डॉ. पुलकुंडवार यांनी घेतला. यामध्ये सैनिकी स्कूल सातारा नुतनीकरण प्रकल्प, सातारा येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 500 खाटांचे रुग्णालय व अनुषंगिक बांधकाम, श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास आराखडा, इको टुरीझम आराखडा, सह्याद्री व्याघ्र वनक्षेत्रातील पर्यटन आराखडा, कोयना हेळवाक वनझोन अंतर्गत् कोयना नदी जलपर्यटन विकास आराखडा, शिवसागर जलाशयावरील तापोळा केबल पुल, कोयना जलाशयावर मुनावळे येथील जलपर्यटन, गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजना, जिल्हा विकास आराखडा आदी सर्वांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.