डॉ. भारत पाटणकर ‘या’ दिवशी 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत करणार पंचगंगा नदीपुलावर ‘रास्तारोको’; नेमकी मागणी काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शासनाच्या अन्यायी धोरणाविरोधात थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी महत्वाची मागणी करत थेट कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पुलावर बुधवार, दि. २९ रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्याचा इशारा आज कराड येथे पत्रकार परिषदेतून दिला. जलसंपदा विभागाने सहकारी पाणीपुरवठा संस्था व व्यक्तिगत कृषिपंप धारकांना जलमापक मीटर बसवण्याबाबत आदेश देत ठोक जलदरात दहा पटीने शासकीय पाणीपट्टीचे दर वाढवून बिले वसूल करण्याचे धोरण चालू ठेवले आहे. ही अन्यायकारक पाणीपट्टी दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी महत्वाची मागणी डॉ. पाटणकर यांनी यावेळी केली आहे.

डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज कराड येथे पी. डी. पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या सभासद, शेतकऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर डॉ. पाटणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. अरुण लाड, माजी आ. संजयबाबा घाटगे, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे आ. जी. तांबे, सांगली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सातारा जिल्हा इरिगेशनचे प्रकाश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले की, शासनाच्या या अन्यायी धोरणाविरोधात आमच्याकडून करण्यात येणाऱ्या रास्तारोको आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्हयातील सहकारी पाणीपुरवठा सभासद, शेतकरी व व्यक्तीगत शेतकरी सहभागी होती. सहकारी पाणी पुरवठा संस्था व व्यक्तिगत कृषिपंप धारकांनी स्वखर्चाने नदीपासून डोंगर कपारीत पाणी सुमारे 200 मीटरपर्यंत पोहोचवून जिरायत जमीन बागायत करुन शासनाचा महसूल वाढविला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला जोपर्यंत उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळत नाहीत, तोपर्यंत शासनाचे जलसंपदाचे दर पूर्वीप्रमाणे माफक ठेवलेले नाहीत. शासनाने केलेली दहापट पाणीपट्टी दरवाढ शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून अशाने शेती करणे मुश्कील होणार आहे.

137c8d4d 32cd 43fa bdc9 255bd2ae0ee5

दहा टक्के पाणी दरवाढ करून शासनाने शेतकऱ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. त्याची सक्तीची वसुली करून बील न भरल्यास सातबाऱ्यावर त्याचा बोजा चढवण्याचा निर्णयही घेतला आहे. आम्ही वीज मीटर मागितले, तरी देत नाहीत. वीजबील आणि पाणीबील भरायला आम्ही तयार आहोत. परंतु, अशा पद्धतीने अन्यायकारक निर्णय शेतकऱ्यांवर लादला जात आहे. वीज कपातीसंदर्भात मी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यावर कंट्रोल बसवण्यात आला. आता त्याची मदत संपल्याने वीज कपात सुरू आहे. शासनात कोणीही तज्ञ व्यक्ती किंवा अधिकारी नसल्याचे आ. अरुण लाड यांनी यावेळी सांगितले आहे.

आम्ही मागे हटणार नाही रास्तारोको करणारच : डॉ. पाटणकर

शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मागण्यासाठी आम्ही कोल्हापुरात रास्तारोको आंदोलन करणार आहोत. त्यामध्ये शासनाकडे शासकीय दहापट पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी, सवलतीच्या दराने पाणीपुरवठा व शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरल्यानंतर राहिलेली मागील थकबाकी रद्द करावी, राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग जोपर्यंत घनमीटर पद्धतीने पाणी वाटप करत नाही, तोपर्यंत जलमापक मीटरची सक्ती करू नये, भ्रष्टाचार थांबवावा अशा मागण्या आम्ही केल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही मागे हटणार नसल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.