सातारा प्रतिनिधी । पालिका प्रशासनास माजगावकर माळ येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करताना त्यांना पुन्हा येथेच हक्काचा निवारा देणे, तसेच स्थलांतरित जागेत सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देणे क्रमप्राप्त आहे. हे लोक जर येथे बेकायदेशीररीत्या राहात आहेत, असे ग्राह्य धरले, तर त्यांचे मतदान तुम्हाला कसे चालले? त्यामुळे प्रशासनाने घरकुलांमध्ये रहिवाशांना अग्रक्रमाने जागा द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पालिका प्रशासनास दिला आहे.
साताऱ्यातील येथील माजगावकर माळ परिसरात पालिकेच्या वतीने गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यात सहभागी करून घेत मोफत व हक्काचे घर देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत माजगावकर माळ येथे निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यास यावेळी गणेश भिसे, स्थानिक समन्वयक सचिन कांबळे, संदीप कांबळे, नागेश सातपुते, पल्लवी काकडे, माया कांबळे, रमेश धडचिरे, गणेश वाघमारे, रेखा खंडूजोडे, विजय कांबळे, बापू खंडूजोडे, बापू भोसले, हीना कच्छी, विजय मोरे, गणेश कांबळे आदींसह नागरिक उपस्थित होते.
यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, ”लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून या भागातील रहिवाशांना हक्काचे घर मिळण्यासाठी संघर्षास सामोरे जावे लागले आहे. दोन्ही निवडणुकीच्या काळात हा मुद्दा ऐरणीवर आला. येथील युवा वर्गाने रहिवाशांचे संघटन करून त्यांना न्याय देण्यासाठी उचललेल्या पावलास निश्चित यश मिळेल, याची आम्हाला खात्री आहे. सुमारे २० वर्षे व त्याहून अधिक काळ येथे राहणाऱ्यांना दडपशाही करून किंवा ऐनकैन मार्गाने तुम्ही स्थलांतरित करू शकत नाही. त्यामुळे माजगावकर माळ व लगतच्या परिसरातील नागरिकांना घरकुल योजनेच्या नावाखाली पालिकेने जबरदस्ती स्थलांतरित करू नये.” याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाशी बोललो असून जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्हाला तारीख देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली.