अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त डॉ. भारत पाटणकरांचा ४ सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये शरद पवारांच्या हस्ते सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कष्टकरी चळवळ क्षीण होत असतानाच श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर हे धरण, दुष्काळग्रस्तांसाठी लढा देत आहेत. ५० वर्षांपासून त्यांचे काम सुरू असून ही एक उद्भत घटना आहे. अशा लढावू नेतृत्वाचा अमृतमहोत्सवानिमित्त ४ सप्टेंबरला कोल्हापुरात कार्यगाैरव सन्मान होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून लोक येणार आहेत, अशी माहिती डाॅ. भारत पाटणकर अमृतमहोत्सवी कार्यगाैरव समितीचे अध्यक्ष ॲड. कृष्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा येथे शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. कृष्णा पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष काॅ. संपत देसाई, सचिव सुधीर नलवडे, विजय मांडके यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. काॅ. देसाई म्हणाले, श्रमिक मुक्ती दलाची स्थापना १९८२ ला झाली. डाॅ. भारत पाटणकर यांनी ५० वर्षांपासून महाराष्ट्रातील धरणग्रस्त, दुष्काळग्रस्तांसाठी लढे उभे करुन यशस्वीही केले. याचबरोबर त्यांचा सांस्कृतिक चळवळीतही सहभाग राहिला. विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील त्यांचे योगदानही मोठे आहे. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचा अभ्यास करताना डाॅ. पाटणकर यांना डावलता येणार नाही.

डाॅ. भारत पाटणकर यांचा अमृतमहोत्सवानिमित्त ४ सप्टेंबरला सकाळी साडे दहा वाजता कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये कार्यगाैरव सन्मान होणार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. कार्यक्रमाला खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी डाॅ. गोपाळ गुरू, मनिषा गुप्ते, वाहरू सोनावणे आणि डाॅ. जयसिंगराव पवार हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास धरणग्रस्त आणि दुष्काळग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहितीही काॅ. देसाई यांनी दिली.

डाॅ. पाटणकर यांच्यावर संदर्भग्रंथ…

डॉ. पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर महाराष्ट्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच आगामी काळात डाॅ. पाटणकर यांच्यावर संदर्भग्रंथ तयार करण्यात येणार आहे. यामध्ये तीन भाग असणार आहेत. ‘श्रमिक’चा आढावा, देशातील सामाजिक-अर्थिक चळवळ आणि डाॅ. पाटणकर यांचा परिवार व त्यांच्या कार्याचा आढावा संदर्भ ग्रंथात असणार आहे. त्याचबरोबर डाॅ. पाटणकर यांच्या कार्यावर एक फिल्मही बनविण्याचा विचार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.