कराड प्रतिनिधी । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकशाहीर वामनदादा कर्डक आणि लोकशाहीर अमर शेख यांचा वारसा पुढे नेण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी वाटेगाव (ता.वाळवा) येथे दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी पहिले शाहिरी लोककला संमेलन आयोजित केलेले आहे. जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता उदघाटन होणार असून अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाई साठे, नातू सचिन साठे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, ही माहिती संमेलनाचे निमंत्रक डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात डॉ. भारत पाटणकर यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रविंद्रकाका बर्डे, नवयान महाजलसाचे शाहीर सचिन माळी, ज्ञानदीप संस्था अध्यक्ष आनंदा थोरात, संतोष गोटल, योगेश साठे उपस्थित होते.
यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले की, वाटेगाव येथील क्रांतिवीर बर्डे गुरुजी स्मारकमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत दोन सत्रात हे संमेलन होणार आहे. यावेळी शाहीर शीतल साठे यांचे छक्कड गायन होणार आहे. पहिल्या सत्रात लोककला, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य हा विषयावर मांडणी केली जाणार आहे. जयंत निकम प्रास्ताविक करणार असून धनाजी गुरव अध्यक्ष आहेत. दुसऱ्या सत्रात शाहिरी आणि लोककलेचे सादरीकरण होणार आहे.
लोककलेने सातत्याने समाजाचे प्रबोधन केलेले आहे. लोककला, लोकशाहिरी ही सामान्य, कष्टकरी आणि पिळल्या जाणाऱ्या माणसांनी जोपासली आहे. मात्र याची मुळे ज्यांच्यामध्ये आहेत, ती माणसं बाजूला फेकली जात आहेत. पूर्वीच्या जात्यावरच्या ओव्या, पेरणी करतानाची गाणी बंदच झाली. आपला माणूस आता टीव्हीला चिटकवून ठेवला आहे. मिरज, पुण्याप्रमाणे अण्णा भाऊंच्या वाटेगाव या जन्मगावी दरवर्षी राज्यातील लोकशाहीर व लोक कलावंतांचे संमेलन वाढत्या स्वरूपात व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. यावेळी शाहीर सचिन माळी आणि रविंद्रकाका बर्डे यांनी संमेलनाबाबत माहिती दिली.