साताऱ्यातील ‘या’ शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं प्राथमिक शिक्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133 वी जयंती सर्वत्र साजरी होत आहे. उच्च शिक्षण घेत डॉ. आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा मूलमंत्र दिला. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपण पाहिल्या आणि ऐकल्या असतील डॉ. आंबेडकरांनी ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले ती शाळा आहे साताऱ्यातील आहे. साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण साताऱ्याच्या राजवाडा परिसरातील सरकारी हायस्कूल येथे झाले. 7 नोव्हेंबर 1900 रोजी त्यांनी पहिल्या इयत्तेसाठी सरकारी शाळेत प्रवेश घेतला. आज ही शाळा प्रतापसिंह हायस्कूल या नावाने ओळखली जाते. ही शाळा त्यावेळी पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत होती. सातारा सरकारी शाळा राजवाडा परिसरात एका वाड्यात भरवली जात असे. आजही हा वाडा इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्राथमिक शिक्षणाची साक्ष देत आहे.

हा वाडा १८२४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार प्रतापसिंहराजे भोसले यांनी बांधला. त्यावेळी राजघराण्यातल्या मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था या वाड्यात केली जायची. १८५१ साली हा वाडा विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश सरकारच्या ताब्यात देण्यात आला. आज प्रतापसिंह हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेची एकूण विद्यार्थी संख्या १२० आहे.

अन् साताऱ्यातील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल झाले

आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ हे सेवानिवृत्त झाल्यावर साताऱ्यात लष्करी भागात वास्तव्यास होते. १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. आंबेडकरनगर या लष्करी छावणीत रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आंबेडकर हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे अपत्य. बाळाचे नाव भिवा ठेवल होत. त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित आहेत. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबासाहेबांचे आडनाव “सकपाळ” असताना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये “आंबडवेकर” असे आडनाव नोंदवून सहा वर्षांच्या भिवाने प्रवेश घेतला.

‘या ‘शिक्षकांनी दिले बाबासाहेबांना प्राथमिक शिक्षणाचे धडे

या शाळेत आंबेडकरांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे ‘आंबेडकर’ असे झाले. नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण होऊन डिसेंबर १९०४ महिन्यातच रामजी मुंबईला सहपरिवारासह गेले. मुंबईतील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या खोलीत राहू लागले. भीमराव हे मुंबईमधील एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले. शाळेला शंभर वर्षं झाली तेव्हा १९५१ साली या शाळेचं नामकरण छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असं करण्यात आलं.