कराड प्रतिनिधी । कराड येथे कोल्हापूर नाक्याजवळ सुरू असलेल्या महामार्ग उड्डाणपुलाचा सेगमेंट बसविताना अचानक निसटल्याने २ कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन उड्डाणपूल उभारणीच्या कामाची नुकतीच पाहणी केली. तसेच उड्डाणपूल उभारणीच्या कामात सावधानता बाळगण्याच्या सक्त सूचना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह पोलीस अधिकारी, वाहतुक पोलीस, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी आ. डॉ. भोसले म्हणाले, की पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत कराड येथे उड्डाणपूल उभारला जात असून, याठिकाणी १२२३ सेगमेंट बसविले जात आहेत. आत्तापर्यंत १०९० सेगमेंट बसविले गेले असून, फक्त १३३ सेगमेंट बसवायचे राहिले आहेत. अशावेळी शनिवारी (ता. १५) रात्री सेगमेंट बसविताना क्रेनमधील तांत्रिक बिघाडामुळे सेगमेंट अचानक निसटल्याने मोठा आवाज झाला. याठिकाणी काम करणारे मजूर बाजूला पळून जाताना त्यांना ईजा झाली. या मजुरांवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भविष्यात अशी कुठलीही घटना घडू नये, तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी उड्डाणपूल उभारणीच्या कामात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी आणि संबंधित ठेकेदार कंपनीने सावधानता बाळगावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या मुदतीत उड्डाणपूलाचे काम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. तसेच उड्डाणपुलाच्या कामाच्या निमित्ताने जो एरिया प्रतिबंधित करण्यात आला आहे, अशा एरियात संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी पायी अथवा वाहनाने जाऊ नये, असे आवाहनही आ. डॉ. भोसले यांनी केले.