कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच लक्ष लागून राहिलेल्या आणि कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी हॅट्ट्रीक साधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महाविकास आघाडीचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला आहे. सुमारे 38 हजार 366 मतांनी डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) यांनी आपला 15 वर्षाचा वनवास संपवत कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कमळ फुलवल आहे. डॉ. अतुलबाबा भोसले यांना 1 लाख 39 हजार 505 मते पडली तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना 1 लाख 150 मते पडली.
भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाची धूळ चारत पुन्हा ओ. अतुलबाबा एकदा जाएंट किलर ठरले आहेत. विशेष म्हणजे कराड दक्षिणसबोत कराड उत्तर आणि पाटण मतदार संघात महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. कराड हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारं शहर. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं गाव. कृष्णा-कोयना यांच्या प्रीतिमसंगमावर वसलेलं हे शहर राज्याच्या शुगर बेल्टमधलं महत्त्वाचं शहर. ऊस कारखानदारीबरोबर इथे शिक्षण क्षेत्रही बहरत आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभेत काँग्रेसशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा आजवर विजय झालेला नाही. पण यंदा मात्र या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने कडवं आव्हान निर्माण केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी याची झलक दिसली. तसेच यावेळेस विधानसभा निवडणुकीत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विजय मिळवला आहे.
फडणवीस, शहा आणि गोव्याचे मुख्यमंत्री, वाघ यांच्या सभांचा करिष्मा दिसला
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात महायुतीकडून अधिकृत उमेवार म्हणून डॉ. अतुलबाबा भोसले निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांनी मतदार संघात अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा देखील घेतल्या आहेत. केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार सौ. चित्रा वाघ यांनी कराड दक्षिण मतदार संघातील अनेक मतदार बांधवांशी संवाद साधला. त्यांच्या या सभा, बैठका यांचा करिष्मा मतदारराजावर चांगलाच उमटला.
पृथ्वीराज चव्हाण यांची हॅटट्रिक हुकली
पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी कराड दक्षिणमधून निवडणूक लढवली. त्यामध्ये ते विजयी झाले. मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर 2009 मध्ये विलासकाका उंडाळकर हे कराड दक्षिणमधून विजयी झाले होते. 2014 ला पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणाहून विजयी झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील पृथ्वीराज चव्हाण अतुल भोसले यांचा पराभव करुन पुन्हा एकदा आमदार बनले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण पुन्हा रिंगणात उभे राहिले असून त्यांच्यासमोर अतुल भोसलेंनी आव्हान उभे केले. या निवडणुकीत विजयी झाल्यास पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मतदारसंघातून हॅटट्रिक करतील असे सुरुवातीला दिसत होते. मात्र, त्यांची हॅटट्रिक हुकली आणि या ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.