कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी निधी मंजुरीचा धडाका; 2 कोटी 10 लाखांचा निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणमधील जवळपास 23 गावांमधील विविध विकासकामांसाठी राज्यसभेचे सदस्य खा. उदयनराजे भोसले यांच्या फंडातून 2 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भाजपा कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे, कराड दक्षिणमधील विकासकामांना गती प्राप्त होणार आहे.

कराड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी खासदार फंडातून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी डॉ. अतुल भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी राज्यसभा स्थानिक विकास निधीमधून सुमारे 2 कोटी 10 लाख निधी मंजूर केला असून, यामध्ये कराड दक्षिणमधील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला सुचविण्यात आले आहे.

यामध्ये नांदलापूर येथील गोपाळ वस्तीत समाजमंदिर बांधण्यासाठी 10 लाख, वडगाव हवेली येथील कराड – तासगाव रस्ता – कोडोली फाटा ते जगताप वस्ती रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी 10 लाख, तसेच विजयनगर, घारेवाडी, येणके, सैदापूर, धोंडेवाडी, म्हारुगडेवाडी, आंबवडे, आणे, शिंदेवाडी (कोळेवाडी), वानरवाडी, गोटेवाडी, संजयनगर – काले, ओंड या गावांमधील अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणेसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 1 कोटी ३० लाख रुपये,

आकाईचीवाडी व चोरमारवाडी येथील अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणेसाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांप्रमाणे एकूण 10 लाख रुपये, साळशिरंबे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 10 लाख, बामणवाडी येथे प्राथमिक शाळेच्या खोली बांधकामासाठी 10 लाख, गणेशवाडी येथील स्मशानभूमीतील रस्ता दुरुस्तीसाठी 10 लाख, कालेटेक येथील गटर बांधकामासाठी 5 लाख, पवारवाडी – नांदगाव येथे गटर बांधकामासाठी 5 लाख, पोतले येथे रस्ता काँक्रीटीकरणासाठी 5 लाख, पोतले येथील जि. प. शाळेसमोर पेव्हर्स ब्लॉक बसविण्यासाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

खा. उदयनराजे भोसले यांच्या सहकार्यामुळे व डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी हा निधी मंजूर झाला असून, या विकासकामांना लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. या निधीमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळणार असल्याने, याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे.