कराड प्रतिनिधी । कराडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी शहरात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
कराडमध्ये गेल्या २-३ दिवसांपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. तसेच कोयना धरणातून विसर्ग सुरु असल्याने कराड परिसरात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अतुल भोसले यांनी कराडमध्ये विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. शहरात जिथे लवकर पुराचे पाणी शिरते, असा पत्रा चाळ परिसर, पाटण कॉलनी परिसर, दत्त चौकातील श्री साईबाबा मंदिर अशा ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका तयार झाला आहे. आज स्थानिक नागरिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत शहरातील विविध ठिकाणांना भेटून परिस्थितीचा आढावा घेतला. पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे तातडीने स्थलांतर करुन त्यांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी ताबडतोब कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे. नागरिकांना या काळात अडचणींचा सामना करावा लागू नये, तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळा व कार्यालयांच्या इमारतींमध्ये पुरेशी व्यवस्था अगोदरच करुन ठेवावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी कराडमध्ये ‘एनडीआरएफ’ची ३० जणांची टीम दाखल झाली असून, या टीमच्या सदस्यांशी डॉ. भोसले यांनी संवाद साधला. यापूर्वीच्या पूरपरिस्थितीत एनडीआरएफने केलेली कामगिरी अभूतपूर्व आहे. पूरस्थितीच्या काळात प्रशासनाने सतर्क राहावे, तसेच नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी यावेळी केले.
याप्रसंगी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, अधिकारी ए. आर. पवार, उमेश शिंदे, प्रमोद शिंदे, समाधान चव्हाण, किरण मुळे, रमेश मोहिते, अभिषेक भोसले यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.