कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणमधील डोंगरी भागातील गावांसाठी राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरु केली. पण सातत्याने उद्भवणाऱ्या विविध अडचणींमुळे ही योजना पूर्णक्षमतेने कार्यान्वित नाही. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणच्या डोंगरी भागासाठी वरदायिनी ठरलेल्या उंडाळे प्रादेशिक पाणी योजनेसंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आज आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आ. डॉ. भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी बैठकीला उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जयदीप पाटील यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे उपअभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. डॉ. भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसह अन्य कोणकोणत्या पाणीपुरवठा योजना चालू आहेत व त्यांची सद्यस्थिती काय, याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
यावेळी अधिकाऱ्यांनी उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीतील कामाचा आढावा सादर करुन, विद्युत जोडणीच्या कामासाठी निधी आवश्यक आहे. दरम्यान, कराड दक्षिणमधील अन्य पाणीपुरवठा योजनांची माहिती घेऊन, या योजना पूर्णक्षमतेने कार्यान्वित सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश आ. डॉ. भोसले यांनी प्रशासनाला दिले.