कराड प्रतिनिधी । ऑगस्ट क्रांती दिनाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी अनमोल योगदान दिले आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन तरुण पिढीने काम करावे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केले.
दुशेरे ता. कराड येथील हुतात्मा स्मारक स्तंभाला डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आनंदा जाधव, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, माजी संचालक माणिकराव जाधव, सरपंच आनंदा गायकवाड, उपसरपंच अर्जुन जाधव, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे, तलाठी विशाल पाटील, ग्रामसेवक संतोष सणस, सुभाषराव जाधव, मारुती जाधव, बाळासो जाधव, लक्ष्मण पवार, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, सयाजी पाटील, पांडुरंग जाधव, दिलीप जाधव, हणमंत जाधव, धनाजी जाधव, शहाजी जाधव, मयूर जाधव, महेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. अतुल भोसले म्हणाले की, हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारत देश घडला आहे. या बलिदानाचे स्मरण करतानाच देशाच्या प्रगतीसाठी आणि देशातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने कटीबद्ध राहण्याची गरज आहे.
ब्रिटीशांना भारतातून हाकलून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनाची हाक देण्यात आली. या आंदोलनामुळे भारतीय जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविले गेले. ज्याची परिणिती म्हणून जनतेच्या अपरिमित संघर्षातून भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. भारत छोडो आंदोलनाचा हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने तसेच त्यांच्या हस्ते ध्वजवंदनही करण्यात आले.