डॉ. आ. ह. साळुंखे यांचे वैचारिक उत्खननाचे काम ऐतिहासिक : माजी आमदार लक्ष्मण माने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सामाजिक समतेची वाटचाल रुजत असताना आजमितीस देशात पुन्हा अनावश्यक धर्मांधता आणि हिटलरशाही उदयास आली आहे. ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, प्राच्य पंडीत डॉ.आ. ह. साळुंखे यांनी वैचारिक उत्खननाचे ऐतिहासिक काम करुन ठेवले असून ते हिमालयाएवढे आहे. त्यामुळे ज्यांना कोणतेच अधिकार नव्हते, त्यांना वास्तव, सत्य विचार कळाले. त्यातून मिळालेले बंधुभावाचे, समानतेचे विचार पुढे घेवून समाजातील प्रत्येक घटकाला निर्णय घ्यावे लागतील, असे आवाहन पद्मश्री साहित्यिक व माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केले.

कोल्हापूर येथील नॅशनल ब्लॅक पँथर राजकीय पक्षाच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल समाजाच्या भल्यासाठी व सर्व समाज एकोप्याने चालावा यासाठी आपल्या प्रकांड अभ्यास व साहित्याकृतीतून विचारांची पेरणी करुन समाजाला शहाणे करणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना त्यांच्या शाहूपुरीतील निवासस्थानी येवून सत्यशोधक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन पद्मश्री लक्ष्मण माने बोलत होते.

याप्रसंगी नॅशनल ब्लॅक पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील पाटील, पक्षाचे पदाधिकारी गौतम करुणादित्य, आनंद कांबळे, नानासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, दिनकर झिंब्रे, रयत शिक्षण संस्थेचे रजिस्टार प्रा. मेनकुदळे, पत्रकार अरुण जावळे, रघुनाथ बाबर, सुनील रोकडे, अंगापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक ढाणे, राकेश साळुंखे, शाहीर रणदिवे, शाहीर फरांदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

लक्ष्मण माने पुढे म्हणाले, आमच्या पूर्वजांनी भोगलेले दिवस परत आणण्याचे काम देशात सध्या सुरु आहे. वास्तविक संविधानानुसार या देशाची वाटचाल व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, सध्या सत्तेत असलेले संविधानानुसार वंचित घटकांसह सर्वांना जे काही मिळाले आहे व त्यावर देशाची वाटचाल सुरु आहे. ते मिळालेले कागदावरुन काढत नाहीत मात्र, प्रत्यक्षात काही देतही नाहीत.

इतिहासातून चांगले घडवण्यासाठी प्रेरणा घ्यायची असते. कोणीतरी येतो आपल्याच महापुरुषांची नावे घेतो आणि विचार मात्र असमानतेचे मांडतो अशा पाठी लागलेल्या युवा पिढीने सावध राहिले पाहिजे. अशा पार्श्वभूमीवरच नॅशनल ब्लॅक पँथरेने डॉ. आ. ह. साळुंखे यांचा जीवन गौरव पुरस्काराने केलेला गौरव ही बाब सामाजिक बदल घडवणारी ठरेल व युवा पिढीने परिवर्तनाच्या दिशेने जावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी केले.

ही सर्व माझी माणसं आहेत ही भावना ठेवून ठामपणे उभे रहावे लागेल : डॉ. आ. ह. साळुंखे

यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या १५० व्या वर्षानिमित्त कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी आजचा हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम केला. आपण सगळेजण माझे स्वकीय आहात. मी कृतज्ञता व्यक्त करतो. २४ तारखेला कार्यक्रम आयोजित केला तेव्हा प्रकृतीमुळे प्रवास करण्याएवढी क्षमता नव्हती त्यामुळे जावू शकलो नाही याचा खेद वाटतो. या कार्यक्रमात माझ्या अर्धशतकाच्या सहकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. त्या अनुसरुन बोलताना मी एवढेच म्हणेन. महात्मा जोतीबा फुले यांच्यामुळे आपल्या सगळ्या वाटा खुल्या झाल्या. सावित्रीबाई फुले यांनी अंत्यत त्रासातून म. फुले यांना साथ दिली. या दोघांमुळे आज आपल्याला हे दिवस पहावयास मिळत आहेत. त्यामुळे आपण त्यांना कदापि विसरता कामा नये. त्यांची महत्वाची कृती म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना. २४ सप्टेबरला १५० वर्षे पूर्ण झाली.

साळुंखे यांच्या विचाराने वाटचाल करा : प्रा. डॉ. यशवंत पाटणे

सध्याच्या सामाजिक वातावरणात जे काही सुरु त्याबद्दल आता बोलावे लागणार आहे. अनेक विचारवंत, साहित्यिकांसह सर्वच समताधिष्ठित विचारांच्या माणसांनी मागे राहून जमणार नाही. उत्सवांना आलेले विभित्स स्वरुप, त्यात वाहून जात असलेली तरुणाई, समाजातील वाढती धर्मांधता, वाढती बेरोजगार व त्यामुळे निर्माण होवू पाहणाऱ्या प्रश्नात सामाजिक शांतता नष्ट होवू पहात असताना डॉ. आ. ह. साळुंखे यांचे साहित्य तरुणांसह सर्वांनीच वाचले पाहिजे. त्यातून प्रेरणा घेवून खऱ्या अर्थान सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी त्यांच्या विचारांनी वाटचाल केली पाहिजे, असे प्रा. डॉ. यशवंत पाटणे यांनी सांगितले तसेच कोल्हापूर येथून येवून तात्यांचा जो सत्कार केला त्याबद्दल सातारकरांतर्फे कृतज्ञताही व्यक्त केली.