सातारा प्रतिनिधी | येणाऱ्या गणेश उत्सव काळामध्ये डॉल्बी किंवा कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम लावण्यास शासनाच्या नियमानुसार बंदी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.
फलटण येथील नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सुनील महाडिक यांच्यासह महावितरण व नगरपरिषदेचे कर्मचारी व गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार डॉ. जाधव म्हणाले की; संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. गणपती उत्सवाला मोठा इतिहास आहे. त्यामुळे गणपती उत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ही गणेशोत्सव मंडळांनी घेतली पाहिजे.
जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार गणेश उत्सव काळामध्ये जे कर्णकर्कश साऊंड सिस्टीम लावतील अश्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार आहेत. यामध्ये मंडळांनी रीतसर परवानगी घ्यावी. आपण गणेश उत्सव काळामध्ये जे सोशल मीडियावर मेसेज पाठवणार आहोत यामुळे कोणताही जातीय तेढ निर्माण होणार नाही; याची काळजी घेणे गरजेचे आहे. सामाजिक समतोल बिघडला नाही पाहिजे याची काळजी घेणे गरजेचे आहे; असे मत पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी व्यक्त केले.