सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या अन् डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळांना सुवर्णपदक

0
445
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पोलीस खात्यातील श्वानाने साताऱ्याच नाव पुन्हा एकदा सातासमुद्रपार पोहचवले आहे. झारखंड राज्याची राजधानी रांचीमध्ये पार पडलेल्या 68 वी ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धेत “स्फोटक शोधणे” या प्रकारात महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने सहभागी झालेल्या सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या आणि डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळ यांनी सुवर्णपदक मिळवलं आहे. सुवर्णपदक प्राप्त केल्यानंतर श्वानासह निलेश साताऱ्यात आज दाखल होताच त्यांचे हलगीच्या निनादात साताऱ्यातील शिवतिर्थावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.

झारखंडमधील रांचीत 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत 68 वी ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 29 राज्य 2 केंद्रशासित प्रदेश आणि 7 सैन्यदलांचे स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये सातारा पोलीस दलाचा बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातील श्वान सूर्या आणि डॉग हॅन्डलर निलेश दयाळ यांनी सुवर्णपदक मिळवले.

स्फोटके शोधणे या प्रकारात लेब्राडोर ही पूर्वपार चालत आलेली जात कमी करून नव्याने ऊर्जावान म्हणून बेल्जियम शेफर्ड या जातीचा समावेश केला आहे. या प्रत्येक ब्रीडची किंमत अंदाजे एक ते दीड लाख रुपयांच्या दरम्यान असते. या स्पर्धेमध्ये भरपूर बेल्जियम मिलोनाइज होते. त्यामध्ये वय वर्षे ८ रनिंग लेब्राडोर जातीच्या श्वान सूर्याने यश मिळवून दाखवले.

भारतातील या प्रकारातील सर्वात मोठी स्पर्धा

अजिंक्यताराच्या कुशीत सतत दोन वर्षे अखंड सराव करून त्या सरावाचे फळ सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्याला मिळाले आहे. ही भारतातील या प्रकारातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी “स्फोटक शोधणे” या प्रकारात सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या आणि डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळ यांनी संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदक मिळवले होते. महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात यश मिळवल्यानंतर झारखंडच्या रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय मेळाव्यासाठी निवड झाली होती. 19 वा राज्य पोलीस कर्तव्य मेळावा पुणे येथे 7 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीत पडला होता.

पोलिसांनी अधिक सक्षमकरणासाठी स्पर्धाचे आयोजन

वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ, नवनवीन तंत्रज्ञान यामुळे गुन्हेगारी आणि गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे अशावेळी पोलीस आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्ये याच्या मदतीने गुन्हेगारी रोखत असतात घडलेल्या गुन्ह्याचा जलद तपास लावत असतात. पोलिसांनी अधिक सक्षम आणि सजग राहावे यासाठी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. दरम्यान, श्वान सूर्यानं अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात सातारा पोलिसांना मदत केली आहे. देश पातळीवर चमकदार कामगिरी मिळवल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस दलाचे अभिनंदन होत आहे.