कराड प्रतिनिधी | घरासमोर आईच्या हाताला धरून चालत निघालेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला चढवला. चिमुकलीला जबड्यात पकडून कुत्र्याने तिला सुमारे पन्नास फूट शेतात फरपटत नेले. मात्र, आईने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्यामुळे ग्रामस्थांनी धाव घेत चिमुकलीला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले. कराड तालुक्यातील कोपर्डे हवेलीत मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अविरा स्वप्नील सरगडे (वय ३) असे गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीवर कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोपर्डे हवेली गावात गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली असतानाच मंगळवारी सायंकाळी तीन वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला केला. गावातील अविरा सरगडे ही तीन वर्षांची चिमुकली मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी आपली आई पूजा यांच्याबरोबर घराबाहेर आली. यावेळी चिमुकली आपल्या आईच्या हाताला धरून घरासमोर चालत असताना अचानकपणे मोकाट कुत्र्याने पाठीमागून येऊन तिच्यावर हल्ला केला.
कुत्र्याने अविराच्या हाताला, दंडाला चावा घेऊन तिला सुमारे पन्नास फूट फरपटत शेतात नेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अविराची आई पूजा यांनी आरडाओरडा करून कुत्र्याला पळवून लावले. पूजा यांनी ग्रामस्थ व नातेवाइकांच्या मदतीने अविराला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले.