सातारा प्रतिनिधी | राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील मूळ गावी दरे येथे आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्या शरीराचे तापमान 105 डिग्री असल्याने त्यांच्यावर चार डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार करण्यात आले. दरम्यान, उपचारानंतर डॉक्टरांनी शिंदेच्या प्रकृतीवर माहिती दिली. कालपासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती. आता प्रकृती चांगली आहे. आता आमच्याशी गप्पा मारत होते. आज ते मुंबईला जाणार असल्याचे डॉक्टर आर. एम. पार्टे यांनी म्हंटले.
काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. पार्टे यांनी शनिवारी रात्री माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना ताप येत आहे, सर्दी आहे, घशाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरू केले आहेत. सलाइन लावले आहे. आयव्ही लावला आहे. त्यांना एक दोन दिवसांत बरे वाटले याची खात्री आहे. कालपासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती. आता प्रकृती चांगली आहे. आता आमच्याशी गप्पा मारत होते.
एकनाथ शिंदे दरे गावी पोहोचल्याचे कळताच आजूबाजूच्या गावातील, जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते भेट घेण्यासाठी आले होते. पण, एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट नाकारली. एकनाथ शिंदे आजारी असून, वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे सांगत अनेकांच्या भेटी नाकारण्यात आल्या. शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले.