सातारा प्रतिनिधी | ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे दुपारी आगमन झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यावेळी खासदार धैरशिल मोहिते – पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार संजय जगताप, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुण्याचे पोलीस अधिकारी पंकज देशमुख, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थामन अधिकारी देविदास ताम्हाणे, पालखी सोहळा विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजन नाथ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच पोलीस विभागाने पालखीला मानवंदना दिली. स्वागतानंतर पालखी सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. पालखी आज आणि उद्या लोणंद मुक्कामी असणार आहे. या पालखी सोहळ्यादरम्यान देसाई यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी फळ वाटप करण्यात आले.
माउलींच्या पादुकांना स्नान
‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात शनिवारी माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माउलींच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला. माउलींचा पालखी सोहळा सुरू करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला. तत्पूर्वी नीरा नदीच्या पवित्र पात्रात माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी उपस्थित माउली भक्तांनी ‘माउली-माउलीऽऽऽ’चा जयघोष करण्यात आला.