जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रम उत्साहात साजरा करा : ज्ञानेश्वर खिलारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान आजपासून जिल्ह्यात राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरे करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी अधिकाऱ्यांना केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अधिकारी खिलारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी खिलारी म्हणाले की, 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर घ्यावेत. शिलाफलक या उपक्रमांतर्गत गावातील संस्मरणीय ठिकाणी (अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत ) शिलाफलकाची उभारावा. शिलाफलकावर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव बोध चिन्ह, प्रधानमंत्री यांचा व्हिजन 2047 संदेश, स्थानिक शहीद, वीरांची नावे (नावे उपलब्ध नसल्यास मातृभूमिची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या वीरांना शतश: नमन असे सामान्य वाक्य लिहावे.

ग्रामपंचायतीचे नाव, दिनांक याबाबी नमूद करावयाच्या आहेत) शिलाफलकाची निर्मिती मनरेगाच्या माध्यमातून करण्यात यावी.वसुंधरा वंदन उपक्रमामध्ये गावातील योग्य ठिकाण निवडून वसुंधरा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करुन अमृत वाटिका तयार करण्यात यावी. यासाठी रोप खरेदी, वृक्षारोपण कार्यक्रम याबाबतचा खर्च महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून करावा. या उपक्रमासाठी आवश्यक रोपे उपलब्धतेबाबत खात्री करावी. पंच प्रण (शपथ घेणे) या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांनी पंच प्रण (शपथ) घ्यावी. ध्वजारोहण कार्यक्रमांतर्गत गाव क्षेत्रातील (अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत) या एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात यावा, असे खिलारी यांनी म्हंटले.

प्रत्येक गावा-गावातील माती एकत्रित केली जाणार

16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत तालुकास्तरावर माती कलाशामध्ये गोळा करणे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करावी. या कलाशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव पेंटकरुन किंवा रेडियमने लिहावे. हा मातीचा कलश 27 ते 30 ऑगस्ट 2023 या दरम्यान प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेवून जाण्यास एका युवकाची निवड करावी. याकरिता नेहरु युवा केंद्र, युवक कल्याण विभागाचे सहाय्य घ्यावे. मागील वर्षी संपूर्ण राज्यात हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला होता. या धर्तीवर 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी म्हंटले.