सातारा प्रतिनिधी | १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे विभागीय नाट्य संमेलन महाबळेश्वरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री आज शनिवारी (दि. २४) सातारा आणि महाबळेश्वरच्या दौऱ्यावर येत आहेत.
खासदार उदयनराजेंचे करणार अभिष्टचिंतन
मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने दुपारी बाराच्या सुमारास साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर आगमन होणार आहे. तेथून ते जलमंदिर पॅलेसमध्ये जाऊन भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने महाबळेश्वरला जाणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाट्य संमेलनाचे उद्घाटन
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरात यंदा १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे विभागीय नाट्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचा स्वीकार करून मुख्यमंत्री उद्या संमेलनाच्या उद्घाटनासाठी महाबळेश्वरला येत आहेत.
मुख्यमंत्र्यांचा अडीच तासांचा धावता दौरा
महाबळेश्वरमध्ये आयोजित करण्यात आलेले नाट्य संमेलन आणि त्याच दिवशी असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून वेळ काढला आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री यांचा दौरा निश्चित नव्हता. मात्र, रात्री उशिरा त्यांचा दौरा निश्चित झाला. मुख्यमंत्र्यांचा हा दोन ते अडीच तासांचा धावता दौरा आहे.