कराड प्रतिनिधी । विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विशेषत: नवयुवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी होण्याच्यादृष्टीने स्वीप कार्यक्रम, थेट महाविद्यालयांशी समन्वय आदी नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा पुणे विभागासाठीचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपायुक्त पुरवठा तथा सहायक मतदार यादी निरीक्षक समीक्षा चंद्राकार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार संघांचे मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त राव म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 204 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘स्वीप’ उपक्रमांची व्यापक जनजागृती करण्यात यावी. मतदार संघनिहाय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करावे. मतदार जनजागृतीसाठी राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. दावे व हरकती स्वीकारण्याच्या तारखेनंतरही मतदार नोंदणी करता येते याची जनजागृती करावी.
यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, सातारचे सुधाकर भोसले, वाईचे राजेंद्रकुमार जाधव, माणच्या उज्ज्वला गाडेकर, पाटण सुनील गाडे, उपमुख्य निवडणूक अधिकारी ग्रा.पं. तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना वाघमळे उपस्थित होते.
मतदार जागृतीसाठी प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांचे सहकार्य घ्या…
सातारा जिल्ह्याला क्रीडा संस्कृतीची मोठी परंपरा आहे. तसेच महाबळेश्वर, पाचगणीसारख्या ठिकाणी चित्रपटसृष्टीतील मोठे कलावंत येत असतात. कलावंत, सेलेब्रिटी, प्रसिद्ध खेळाडू यांच्याकडून मतदार नोंदणी आवाहनाचे संदेश घेऊन ते व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुग, इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात प्रसारित करावेत. नीतीमूल्याधारित (एथिकल) मतदानाचा संदेश अधिकाधिक पोहेचवा. मतदार जागृतीसाठी ‘डिस्ट्रिक्ट ॲम्बेसॅडर, ‘यूथ आयकॉन’ नेमावेत, असेही राव यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा घरोघरी संपर्क : डुडी
सातारा जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत १६ हजारावर तर आजपर्यंत सुमारे २० हजारापर्यंत युवा मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी नाविण्यपूर्ण कल्पनांचा अवलंब केला असून पाटण मतदार नोंदणी अधिकारी यांनी सांगली जिल्ह्यात पुनर्वसनाने स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही केली. ग्रामीण भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा घरोघरी संपर्क असल्याने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला लाभ झाल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी म्हंटले.