सातारा प्रतिनिधी । वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी करुन खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी, शिवीगाळ दमदाटीसारखे सातत्याने गुन्हे करणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२२ पासून आज अखेर जिल्ह्यातील ९० जण तडीपार झाले आहेत.
अक्षय गोरख माळी, सनी ऊर्फ राहुल सुरेश जाधव, सारंग ज्ञानेश्वर माने, आणि वसंत ताराचंद घाडगे (सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, वाई) असे तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.आर.भरणे यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यांचेकडे सादर केलेला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी बी.वाय. भालचिम, यांनी सदर प्रस्तावाची चौकशी केली होती.
टोळीतील चौघांना वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही. ते वाई परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांच्यात कायद्याचा धाक न राहिल्यामुळे वाई तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. या टोळीवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत होती. या टोळीवरील हद्दपारीच्या प्रस्तावावर हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर सुनावणी झाली. पोलीस अधीक्षकांनी चौघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला.
नोव्हेंबर २०२२ पासून ९० जणांवर तडीपारीची कारवाई
नोव्हेंबर २०२२ पासून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे २२ उपद्रवी टोळयांमधील ७१ जणांना, कलम ५६ प्रमाणे १७ जणांना, ५७ प्रमाणे २ जण, अशा एकूण ९० जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.