देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा : जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात महायुतीच्या आठही उमेदवारांनी घवघवीत यश मिळाले आहे. तसेच राज्यातही भाजपने १२८ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, अशी एकमुखी मागणी सातारा भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठकीत ठरावाद्वारे केली आहे. पदाधिकाऱ्यांचा हा ठराव वरिष्ठाला नेतृत्वाला कळवण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुढील १५ दिवसात महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

यावेळी धैर्यशील कदम म्हणाले, राज्यात महायुती शासनाने राबवलेली लाडकी बहीण योजना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे राज्यात भारतीय जनता पार्टीला १२८ जागा मिळाल्या हे घवघवीत यश सर्वसामान्यांसाठी विकास योजना राबवल्यामुळेच मिळाले आहे. या यशामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका आहे. त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे अशी जिल्हा कार्यकारिणीची धारणा आहे. त्यामुळेच ठराव केल्याचेही कदम यांनी म्हंटले.