सातारा प्रतिनिधी | महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये बालगृहे कार्यरत असून या बालगृहात अनाथ, निराधार, उन्मार्गी, विधी संघर्षग्ररूस्त मुले/मुली दाखल आहेत. दाखल प्रवेशितांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील बालगृहात दाखल असलेल्या व इतर विद्यालयातील एकुण २०० प्रवेशितांच्या जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवा अंतर्गतच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.
हा बालमहोत्सव दि. 30 जानेवारी ते 1 फेबुवारी या कालावधीत पोलीस कवायत मैदान, सातारा येथे होणार असून बालमहोत्सवाचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्रीशंभूराज देसाई यांच्या हस्ते दि. 30 जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधिक्षक समीर शेख , अति. मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले मार्गदर्शन करणार आहेत. दि. 1 फेबुवारी रोजी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने या बालमहोत्सवाचा समारोप होणार आहे.
या क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, १०० मिटर धावणे, २०० मिटर धावणे, ४०० मिटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा, संगित खुर्ची, उंच उडी, लांब उडी, इत्यादी क्रिडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. बौध्दिक स्पर्धांमध्ये बुध्दीबळ, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, समूह गीते या स्पर्धा होणार आहेत. महोत्सवामध्ये विजेता ठरलेल्या विजयी व उपविजयी संघाना त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी बालकांना प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.