सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागात दरवर्षी सर्पदंशामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हे मृत्यू रोखण्यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत. सर्पदंशाच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. सर्पदंश प्रतिबंध, सर्पदंशाचे परिणाम आणि त्याच्या गंभीर धोक्यांच्या व्यवस्थापनासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर सर्पदंश कृती आराखडा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्पदंश या समस्येच्या निराकरणासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रण उपक्रम राबविण्यात येत आहे. २०३० पर्यंत सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती आराखडा विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. सर्पदंशाच्या घटना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घडतात, तसेच पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते.
आरोग्य सेवा व पाथ संस्थेच्या संयुक्त प्रयत्नाने सर्पदंश प्रतिबंधासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्पदंशावर करावयाच्या उपाययोजनांसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत आरोग्य विभाग, वन विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय विभाग यांच्या समन्वयाने करायच्या उपाययोजनांचे नियोजन तयार करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी आयुक्तालयाला सादर करा, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.