सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. एकीकडे महायुतीचे सरकार तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपल्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, आज एक महत्वाची पत्रकार परिषद काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी मागील वेळी झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली असल्याचे देसाई यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी, भाजप पाठोपाठ आता काँग्रेसकडून देखील स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे.
राष्ट्रीय काँग्रेसला १३८ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दि. २८ डिसेंबर रोजी नागपूरला पक्षाचे महासंमेलन होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १५ हजार काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. तत्पूर्वी आज सातारा येथे महासंमेलनाबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. यसेच पत्रकार पत्रकार परिषद देखील पार पडली. यावेळी मनोहर शिंदे, अॅड. श्रीकांत चव्हाण, निवास थोरात, धनश्री महाडिक, रजनी पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केला. युतीत सर्वच पक्ष मतदारसंघावर दावा करतात. तसेच आघाडीत तुम्ही सातारा मतदारसंघ लढविणार का ? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी सरचिटणीस नरेश देसाई यांना विचारला. यावर देसाई यांनी साताऱ्यात आघाडीची बैठक झाली. त्यावेळी पृश्वीराज चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी आम्ही मागणी केली. तसेच आघाडीत उमेदवारीबाबत काय निर्णय होईल, त्याच्याशीही आम्ही प्रामाणिक राहू, असे देसाई यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर दिले.
नागपूरच्या महासंमेलनास जिल्ह्यातून 15 हजाराहून अधिक कार्यकर्ते जाणार
नरेश देसाई पुढे म्हणाले की, राष्ट्रीय काँग्रेसला एक परंपरा आहे. हा पक्ष आता २८ डिसेंबरला १३८ वर्षे पूर्ण करत आहे. यासाठी नागपूरला महासंमेलन होत आहे. याची पूर्ण तयारी होत आलेली आहे. या संमेलनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खासदार सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहूल गांधी हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर देश आणि राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होतील. यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक ते दोन हजार कार्यकर्ते नेण्याबद्दल नियोजन आहे. तरीही १५ हजार कार्यकर्ते निश्चित सहभागी होतील, असा विश्वास आहे. तसेच नागपूरमधील मेळाव्यात राज्य आणि देशातून १० लाख कार्यकर्ते सहभागी होतील असाही अंदाज असल्याचे देसाई यांनी सांगितले.