सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रभारी रामेश चेलिनाठ यांच्या उपस्थितीत दि. २३ जानेवारी रोजी पुण्याच्या काँग्रेस भवनात बैठक होणार आहे. यामध्ये तालुकानिहाय आढावा घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक आज रविवारी सकाळी ११:३० वाजता काँग्रेस भवनात होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली.
प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रामेश चेलिनाठा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे होणाऱया बैठकीत बूथ कमिटी, बीएलए मंडळ कमिटीबाबत माहिती घेतली जाणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी सकाळी 11 : 30 ते दुपारी 3 वेळेत बैठक होणार आहे.
या बैठकीस सर्व प्रदेश प्रतिनिधी, तालुकाध्यक्ष तसेच सर्व आघाडी सेलचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तालुकानिहाय तयार झालेल्या बीएलए यांची नावे व बूथ कमिटीचा तसेच अपूर्ण बूथ कमिटीबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निहाय मंडळ कमिटी, प्रत्येक गावस्तरावर ग्राम समिती स्थापन करणे, आगामी लोकसभा, विधानसभा व अन्य निवडणुकांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत आढावा घेण्यात येणार आहे.