अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी अल्पसंख्यांकांच्या कल्याणाकरिता नवीन 15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अल्पसंख्यांक समाजातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, अल्पसंख्यांक समुदायामध्ये विशेषत: स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करावा. केंद्र व राज्य शासनामार्फत अल्पसंख्यांकाच्या कल्याणा करिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ द्यावा. त्याचबरोबर देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचाही वेळोवेळी आढावा घ्यावा.

सातारा शहरातील सदरबझार शाळेच्या इमारतीसाठी बांधकामासाठी नगर पालिकेने प्रस्ताव सादर करावा. या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल. अल्पसंख्यांक समाजातील मुला-मुलींना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी शिबीराचे आयोजन करावे. तालुकास्तरीय शांतता कमिटीची वेळोवेळी बैठकाही घ्याव्यात, अशा सूचना करुन बैठकीमध्ये मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत सांगितले.