सातारा प्रतिनिधी । जागतिक क्षयरोग दिनानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्षयरोग मुक्त होण्यासाठी शासकीय, सामाजिक, खाजगी संस्थांनी संघटीत होवून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल खाडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सचिन पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. क्षय रोगाचे दूरीकरण करणेसाठी जास्तीत जास्त संशयित रुग्णांचे क्षय रोगासाठी तपासणी करून लवकर निदान करून सदर रुग्ण उपचाराखाली आणले तर आजाराचे संक्रमण, प्रसार रोखता येईल तसेच क्षय रुग्णांना आधार देणेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी, सामाजिक संस्था, संघटना यांनीही काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. करपे यानी क्षयरोग आजारासाठी मोफत औषध उपचार पद्धती, औषध उपलब्धता याबाबत माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांनी राष्ट्रीय क्षय रोगदूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कामकाजाची माहिती दिली. तसेच सध्यस्थितीत क्षयरोग रुग्णांसाठी असणाऱ्या शासकीय योजना, उपक्रम यांची माहिती दिली. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. पाटील सातारा यांचे हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सन २०२४ मध्ये टी. बी. मुक्त झालेल्या ग्रामपंचायती यांचा गौरव, खाजगी वैद्यकीय व्यावसाईक यांना सन्मान चिन्ह, क्षय रुग्णांना फूड बास्केट देणेत आले .