सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी फलटण तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय सुविधा व सामाजिक प्रकल्पांचा आढावा घेतला. हा दौरा त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच फलटण तालुक्यात केला होता, ज्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन स्थानिक लोकांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तरडगाव येथील पालखीतळ व माझेरी येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीचा दौरा केला. या ठिकाणी शिक्षण सुविधा, शिक्षकांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांबाबत तपासणी केली. शाळा व अंगणवाड्यांमध्ये स्वच्छता, सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा याबाबतची माहिती घेतली.
बरड पालखीतळ येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा दौरा केला. येथे आरोग्य सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता, औषधे आणि रुग्णसेवा याबाबतची तपासणी केली. आरोग्य केंद्रातील सुविधा आणि सेवांच्या दर्जाबाबत समाधानकारक माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राजुरी येथील साधुबुवाचा ओढा पालखी विसावा येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली.