ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर अन् बैलगाड्या वाहनांच्या रिफ्लेक्टरबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

0
20

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि बैलगाड्या यांच्या मागे व पुढे उच्च दर्जाचे रिफ्लेक्टीव्ह (स्टिकर) लावले नसल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघाताच्या घटना जिल्ह्यात तसेच कराड तालुक्यात घडलेल्या आहेत. दरम्यान, अजून अपघाताच्या घटना घडू नयेत तसेच रिफ्लेक्टीव्ह (स्टिकर) लावण्यात यावेत याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नुकताच आदेश जारी केलेला आहे. त्यामुळे ऊस वाहतूक वाहनांना रेडिअम, रिफ्लेक्टर लावा नाहीतर संबंधितांवर कारवाई देखील केली जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशामध्ये रिफ्लेक्टीव्ह लावणार नाहीत अशा वाहनांना व बैलगाड्यांना सर्व रस्त्यांवर आणि सर्व परिसरामध्ये (साखर कारखान्यात) जाण्यास प्रतिबंध करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले असून आता ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या तसेच ट्रॅक्टर वाहनांना रिफ्लेक्टीव्ह लावणे बहनकारक असणार आहे.

रिफ्लेक्टर अभावी होतात अपघात

क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने ही वाहने रस्त्यावरील चढ-उतार, वळणांवर हेलकावे मारतात. तर बऱ्याचदा ड्रायव्हरला पाठीमागील वाहनांचा अंदाजही येत नाही. त्यात भरीस भर म्हणून मोठ्या आवाजातील संगीत ऐकत ट्रॅक्टर चालकांचा आपल्याच नादात प्रवास सुरु असतो. काही मद्यधुंद बहाद्दरांना अपघात व पाठी मागून येणाऱ्या वाहनांचे काहीही देणे घेणे नसते. कारखाना स्थळावर वेळेवर ऊस पोहचावा म्हणून वाहनांचा वेग वाढवला जातो. त्यामुळे वाहन पलटी होण्याचा धोका असून इतर सहप्रवासी वाहनांना अपघाताचा धोका वाढला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नसलेली वाहने रस्त्यावर थांबवल्यामुळे रात्रीच्या अंधारात दुचाकी, चारचाकी वाहने या ट्रॉलीला धडकून अपघात होत आहेत.

ऊस लादताना उंची मर्यादित ठेवा

वाहनांवर ऊस लादताना उंची मर्यादित ठेवावी, कारण उंची वाढल्यास वाहन उलटण्याचा धोका निर्माण होतो.
ट्रॅक्टर-ट्रेलरची एकत्रित लांबी १८ मीटरपेक्षा अधिक असू नये.
मोठ्या आवाजाचे स्पीकर वाहनांवर लावणे टाळावे, कारण त्यामुळे इतर वाहनांचे हॉर्न ऐकू येत नाहीत आणि अपघात होण्याची शक्यता वाढते.
वाहनचालकांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहतूक करावी आणि वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवून चालवावे.